श्रीरामपूर दि 19 (वार्ताहर) धन-संपत्तीला नव्हे तर धर्माला महत्व देण्याची गरज आहे. पैशामुळे आर्थिक स्थिती सुधारते पण धर्म मानसिक शांतता टिकवितो असे विचार जैन स्थानकमध्ये चातुर्मास साठी सुरु असलेल्या प्रवचनातून प्रखर व्याख्यात्या पू .श्री .विश्वदर्शनाजी म .सा यांनी व्यक्त केले.
आज सर्वत्र पैशाला महत्व दिले जाते. धर्माला गौण स्थान दिले जात आहे. हि काळजी करण्यासारखी बाब आहे. ती बदलली पाहिजे.असे स्पष्ट करून त्यांनी सांगितले की, धर्मानुसार वागणे हेच आपले कर्तव्य ठरते. पैसे आज आहे उद्याचा भरवसा नाही. धर्म शाश्वत असतो. तोच आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवितो .धर्माचरण केल्याने मानवी जीवन सफल होते. आजचा करोडपती उद्याचा रोडपती हि होऊ शकतो .पण धर्मानुसार वागणाऱ्याला नेहमीच चांगला मार्ग सापडतो .
धर्मामुळे सिद्धी प्राप्त होण्याचा मार्ग सापडतो. २३ जुलै ते 29 जुलै पर्यंत होणारे आनंद सप्ताहात सर्वानी सहभाग घ्यावा. चातुर्मास यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले. धर्म व धन एकाच राशीचे आहेत. धर्म संसारापासून वेगळा करतो तर धन संसाराचे महत्व वाढविते. संसाराची आसक्ती कमी करून धर्माकडे वळालात तर कल्याणच होईल.
प.पु .तिलकदर्शनाजी प्रवचनातून म्हणाल्या की ,देव,धर्म ,गुरु यांच्या बाबतीत आस्था ठेऊन समर्पणाची भावना असावी. धर्मश्रद्धा जागृत व्हावी म्हणून धर्म आराधना करीत राहा.चातुर्मासमध्ये सामायिक साधनेला महत्व आहे. गुरु प्रति आदर व श्रद्धा व्यक्त करण्यासाठी सामायिक करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.