Sagevaani.com /जालना : सुर्योदयाला अनन्य साधारण असे महत्व आहे. पूर्वी लोक सुर्योदयापूर्वी जेवायचे आणि सुर्यास्तानंतर जेवण सोडून देत असत, असा हितोपदेश संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी साध्वी प. पू. सत्यसाधनाजी म. सा.यांनी येथे बोलतांना दिला.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. यावेळी विचारपीठावर संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी प. पू. सत्यसाधनाजी म. सा. व अन्य काही साध्वींची याप्रसंगी उपस्थिती होती. आज संघामध्ये विविध प्रकारचा जाप करण्यात आला. श्रावक- श्राविकांना उभे राहून चारही दिशांना वळण्याचे सांगण्यात आले.
पुढे बोलतांना संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी साध्वी प. पू. सत्यसाधनाजी म. सा. म्हणाल्या की, खरे तर सिंह राशीच्या लोकांना सुर्याचे खूप वेड आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. सिंह राशीचा स्वामी आहे सुर्यदेव! सुर्याचं महत्व काय आहे? आपण सुर्याला मानतो का नाही? मानतो! जेव्हा सुर्योदय होतो तेव्हाचं वातावरण पहा! म्हणूनच पूर्वीचे लोक सुर्योदयानंतर जेवण करायचे आणि सुर्यास्तनंतर जेवण त्यांच्यासाठी वर्ज्य होते. ते जेवण सुध्दा करत नव्हते. अजूनही अनेक जण सुर्यास्तानंतर जेवत नाहीत, असे सांगून संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी साध्वी प. पू. सत्यसाधनाजी म. सा. यांनी आपल्या प्रवचनातून सुर्याबद्दल इंत्यभूत माहिती दिली. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती.