जालना : जन्म घेणे हे आपल्या हातात नसले तरीही आपण ज्यासाठी जन्माला आलो, हे आपल्याला कळायला हवे. परंतू मनुष्य देह हा असा आहे की, त्याला जे उगमत नाही, तेच तो करु लागतो, म्हणूनच तो परमात्मा बनू शकत नाही, असा हितोपदेश साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनी येथे बोलतांना दिला.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. यावेळी विचारपीठावर संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी प. पू. सत्यसाधनाजी म. सा. व अन्य काही साध्वींची याप्रसंगी उपस्थिती होती. आजही संघामध्ये साध्वी प. पू. अर्हतज्योतीजी म. सा. यांनी विविध प्रकारचा जाप केला.
पुढे बोलतांना साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. म्हणाल्या की, कोणी कोठे जन्म घ्यावा, हे आपल्या हातात नाही. कोणी सधन कुटूंबात तर कुणी गरीब कुटूंबात जन्माला येतो. परंतू ही सारी भगवंताची लिला समजावी, जन्म घेणे हे आपल्या हातात नसले तरीही आपण ज्यासाठी जन्माला आलो, हे आपल्याला कळायला हवे. परंतू मनुष्य देह हा असा आहे की, त्याला जे उगमत नाही, तेच तो करु लागतो, म्हणूनच तो परमात्मा बनू शकत नाही. भगवान महावीरांचे उदाहरण घ्या, त्यांना अनेकविध यातनांना सामोरे जावे लागले परंतू ते कशाही प्रकारे डगमले नाहीत. त्यांनी आपले नामस्मरणाचे कार्य सुरुच ठेवले. यातना भोगणे हे देवालाही चुकले नाही. तुम्ही आम्ही तर मनुष्य म्हणून जन्माला आलो आहोत. नाही तर एका कानात ठोकलेला खिळा दुसर्या कानावाटे बाहेर येतांना त्यांना किती तरी यातना सहन कराव्या लागल्या असतील परंतू ते आपल्या कर्मगतीपासून सूतभरही मागे हटले नाहीत. म्हणून ते देवस्वरुपात विराजमान झाले. आपला आत्माही परमात्मा बनू शकतो, परंतू आपण तसे वागले पाहिजे, तसे वावरले पाहिजे. त्याशिवाय परमात्मा बनने शक्य नाही. परंतू आपण तसे करत नाही, हीच आपली चूक आहे, असे सांगून साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनी आपल्या प्रवचनातून विविध उदारणे दिली. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती. शेवटी संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी सुत्रसंचालन करुन उपस्थित सर्वांचे आभार मानले.