जालना : क्रियाशिल आणि भावनाप्रधान यामध्ये खूप मोठे अंतर आहे. क्रियाशिल म्हणजे काय तर… परंतू भावनाप्रधान म्हणजे काय? जैन धर्म हा भावनाप्रधान आहे. म्हणूनच अनेकजण या धर्माकडे वळले आहेत, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, बर्याचदा आपण बाह्य स्वरुपाला पाहून निर्णय देतो, परंतू असा निर्णय देणे योग्य आहे काय? नाही ना! तरीही आम्ही भाह्य स्वरुपाला पाहून निर्णय देतो. असा निर्णय देणे म्हणजे स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे. पुण्य आणि पाप याच्यात जसे अंतर आहे, तसेच अंतर क्रिया आणि भावनामध्येही आहे. जोपर्यंत पुण्य आणि पाप राहिलं तोपर्यंत आम्ही संसारातच अडकून पडणार, हे निश्चीत आहे.जेव्हा पापाचा उदय होतो, तेव्हा हातात हातकडी आणि पायात बेडी! हातकडी आणि पायात बेडी कुणी घातली तर पापाने! असेही त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली.
त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.