खरं तर माणसाला दुःखी कोणी करूच शकत नाही. पण त्याच्या स्वतःच्या स्वीकारण्याच्या प्रवृत्तीमुळे, नको त्या अपेक्षा बाळगल्यामुळे तो सहजपणे दुःखी होतो. हे समजण्यासाठी एक साधं उदाहरण घेऊ.
समजा, तुम्ही २०० रुपयांचा मातीचा माठ घेतला आणि त्याच दिवशी खास पाहुण्यांच्या स्वागतासाठी २५० रुपयांचा फुलांचा बुके घेतला. पाहुणे आले, स्वागत झाले, आणि निघून गेले. संध्याकाळी कुणाच्या चुकीने तो माठ फुटला, तर तुम्हाला दुःख होईल. कारण तुमची अपेक्षा होती की हा माठ किमान १-२ वर्षं टिकेल. पण एका दिवसातच तो फुटला, त्यामुळे मनात वेदना निर्माण झाली. पण त्याच वेळी, बुके माठापेक्षा जास्त किमतीचा असूनही संध्याकाळी केराच्या टोपलीत जाणार हे आपल्याला आधीच माहीत असतं. त्यामुळे त्याबद्दल आपण दुःखी होत नाही. हीच खरी गंमत आहे!
आपल्या जीवनातलं बहुतेक दुःख या अपेक्षांमुळेच येतं. म्हातारे आई-वडील सर्वाधिक दुःखी असतात तेही अपेक्षांमुळेच. ज्यांनी मुलांकडून खूप अपेक्षा ठेवल्या, त्यांचे दुःख वाढलेले असते. पण ज्यांनी अपेक्षांना दूर ठेवलं, ते आनंदात जगतात.
दुःखाचं मूळ कारण अपेक्षा हेच आहे. म्हणून आजपासून घरातील लोकांकडून, मित्रांकडून, नातेवाईकांकडून काहीही अपेक्षा ठेवू नका. मी खात्रीने सांगतो – तुम्ही कधीही दुःखी होणार नाही. अपेक्षा सोडा आणि सुखी व्हा!
आपण ज्या झाडाला फळं-फुलं येत नाही त्या झाडाला ‘बिनकामाचं’ झाड म्हणतो. पण ते झाड जरी फळ-फुलं देत नसलं तरी निदान सावली तरी देतं. हाच नियम आपल्या घरातील वडीलधाऱ्यांनाही लागू होतो.
त्यांचे अस्तित्वच आपल्याला नकळत आधार देत असतं. त्यांचे अनुभव आणि आशीर्वाद हे घरासाठी खूप मोलाचे असतात.
घरातून बाहेर पडताना डोकं ठेवून नमस्कार करण्यासाठी ते पाय घरात असणं हीच मोठी संपत्ती आहे. म्हणून, अपेक्षांच्या पिंजऱ्यातून मुक्त व्हा आणि जीवनात सुखाचा अनुभव घ्या!