प्रवचन – 23.08.2025 – प पू श्री मुकेश मुनीजी म सा – (बिबवेवाडी जैन स्थानक)
जैन धर्मात आत्मशुद्धी व साधनेच्या मार्गावर चालण्यासाठी अनेक भावनांचे वर्णन केले आहे. त्यामधील एक महत्त्वाची भावना म्हणजे प्रमोद.
प्रमोद म्हणजे श्रेष्ठ गुणांनी युक्त साधूंप्रति आदर, गौरव व आनंद व्यक्त करणे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर – थोर संत, आचार्य, साधू, विद्वान यांच्या गुणांची प्रशंसा करणे आणि त्यांच्या साधनेतून, त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेणे, हेच प्रमोद.
अकराव्या शतकातील आचार्य हेमचंद्रांनी त्यांच्या प्रसिद्ध ग्रंथात “त्रिषष्ठीशलाकापुरुषचरित्र” मध्ये प्रमोद भावनेचा उल्लेख केला आहे.
त्यात एक प्रसंग येतो –
राजा शतबळ यांनी आपल्या पुत्राला राज्य दिले आणि स्वतः एका आचार्यांच्या चरणी शरण गेले. त्यांनी ध्यानधारणेत लीन होऊन मैत्री, प्रमोद, करुणा, माध्यस्थ्य अशा चार भावनांचा अंगीकार केला. त्यामुळे त्यांचे मन सदैव शांतीत, आनंदात आणि मुक्तीसमान स्थितीत राहिले.
यातून आपल्याला शिकायला मिळते की –ज्यांच्या जीवनात साधू, संत, आचार्य यांच्या गुणांची प्रशंसा आहे, त्यांचे मन नेहमी प्रसन्न राहते आणि आत्म्याचा उन्नतीमार्ग खुला होतो.
जेव्हा आपण साधू-संतांच्या गुणांची प्रशंसा करतो, तेव्हा आपल्याला त्यांच्याशी जोडलेपण वाटते आणि साधनेसाठी प्रेरणा मिळते. दुसऱ्याच्या महानतेकडे बघून मनात मत्सर न ठेवता जर आपण आनंद मानला तर तो खरा प्रमोद. प्रमोदभावामुळे मन शांत राहते, समाधान वाढते.
प्रमोद भावना ही केवळ आदर नाही तर आनंदाने केलेला गुणगौरव आहे. जेव्हा आपण साधूंप्रति, संतांप्रति किंवा गुणीजनांप्रति प्रमोद दाखवतो, तेव्हा त्यांच्या गुणांचे अनुकरण आपल्या जीवनातही होऊ लागते.
“प्रमोदानेच आत्म्याचा प्रकाश उजळतो, आणि प्रमोदानेच मुक्तीचा मार्ग सोपा होतो.”
म्हणून चला, साधूंच्या गुणांचा, थोर पुरुषांच्या विचारांचा व संतांच्या कार्याचा गौरव करूया, आणि त्या प्रमोदभावनेतून आपले जीवन आनंदमय बनवूया.