जालना : जैन समाजातील आठ दिवसांच्या पर्युषण पर्वाचा समारोप झाला. अंतिम दिवस संवत्सरी महापर्व – आलोयणा हा जैन धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी सकाळपासूनच शहरातील विविध जैन मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली. सर्वत्र धार्मिक वातावरण, उपवास, स्वाध्याय व सामूहिक प्रतिक्रमणाचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी प.पू. रमणिकमुनीजी म.सा. यांनी आपल्या प्रबोधनपर प्रवचनातून संवत्सरीच्या पावन दिवसाचे महत्त्व व तत्त्वज्ञान अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की – मानवी जीवनात चुका अपरिहार्य आहेत.
विचारांनी, वाणीने वा कृतीने आपण कितीही सजग राहिलो, तरी कधी ना कधी नकळत इतरांना दु:ख पोहोचतेच. पण त्या चुकांकडे दुर्लक्ष न करता त्या कबूल करणे आणि त्यासाठी क्षमा मागणे हेच खरी साधना आहे. क्षमा मागणारा आणि क्षमा करणारा – दोघांचेही अंत:करण हलके होते, आत्मा पवित्र होतो आणि समाजात सौहार्द जपले जाते. ते पुढे म्हणाले की, आलोयणा म्हणजे आत्मपरीक्षणाचा मार्ग आहे. आपल्या चुकीच्या कृती, बोललेले कटू शब्द आणि केलेल्या अन्यायाची कबुली देणे हे आत्मशुद्धीचे पाऊल आहे. आपण जर इतरांकडून क्षमा मागितली आणि इतरांना क्षमा केली, तर घराघरात, समाजात आणि राष्ट्रातही मैत्री, सौहार्द आणि समतेचे वातावरण निर्माण होईल. क्षमा म्हणजे केवळ धार्मिक कर्मकांड नाही, तर ती जीवनाला नव्या दिशेने नेणारी दिव्य शक्ती आहे. मिच्छामी दुक्कडम या एका वाक्यावर विशेष भर देत मुनीश्रींनी सांगितले की, या छोट्या पण पवित्र वाक्यात जगभरातील तणाव, वैरभाव, कटुता आणि द्वेष संपवण्याची ताकद आहे. मिच्छामी दुक्कडम् उच्चारताना आपण केवळ औपचारिक क्षमा मागत नाही, तर खर्या अर्थाने आपल्या मनातील अहंकार, मत्सर आणि क्रोध सोडून शांततेच्या मार्गावर चालण्याची प्रतिज्ञा करतो.
या क्षमाभावानेच आत्मिक प्रगती होते. शेवटी मुनीश्रींनी आवाहन केले की संवत्सरीचा हा दिवस आपल्याला वर्षभरासाठी प्रेरणा देणारा आहे. क्षमा, संयम, अहिंसा आणि धर्माचरण या जैन धर्माच्या अमूल्य तत्त्वांचा स्वीकार करून आपण आपले जीवन समृद्ध करावे, हाच या पर्वाचा खरा संदेश आहे. संवत्सरी निमित्त जैन समाजात दिवसभर विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळपासूनच मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी झाली होती. सर्वांनी ध्यान, स्वाध्याय आणि प्रार्थनेत सहभागी होत आत्मशुद्धीचा संकल्प केला. अनेकांनी आजच्या पवित्र दिवशी कठोर साधनांचा अंगीकार केला काहींनी निर्जल उपवास केला, तर काहींनी आयंबिल, एकासन व बेलेन आचरणात आणले. अनेकांनी प्रतिक्रमण सूत्रांचे पठण करून आपल्या दैनंदिन जीवनातील दोषांची कबुली दिली. सायंकाळी मंदिरांमध्ये सामूहिक प्रतिक्रमण व आलोयणा पार पडली. या वेळी सर्व भाविकांनी एकमेकांकडे मिच्छामी दुक्कडम् म्हणून क्षमा मागितली आणि दिली. या क्षणाला वातावरणात समता, क्षमा व शांततेचे दैवी स्पंदन जाणवत होते. मंदिर प्रांगणात दिवसभर प्रवचन, सामूहिक पाठ, प्रार्थना व भजन यामुळे एक दिव्य व पवित्र वातावरण निर्माण झाले होते. स्त्री-पुरुष, लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व जण भक्तिभाव, संयम आणि साधनेत सहभागी झाले. या धार्मिक उपक्रमांनी संवत्सरी महापर्वाचे वैभव अधिक वृद्धिंगत झाले आणि भाविकांना आत्मजागृतीचा एक अनोखा अनुभव मिळाला. संवत्सरी महापर्वाच्या निमित्ताने अनेक भाविकांनी आपली भावना व्यक्त केली.
त्यांच्या मते, हा दिवस केवळ धार्मिक परंपरा नसून जीवनशैली घडविण्याचा मार्ग आहे. एका वयोवृद्ध भाविकांनी सांगितले या दिवशी आपण एकमेकांशी झालेले मतभेद, गैरसमज विसरून ङ्गमिच्छामी दुक्कडम्फ म्हणून क्षमा मागतो. त्यामुळे घराघरात समरसतेचे, शांततेचे व प्रेमाचे वातावरण निर्माण होते. एका तरुण भाविकाने व्यक्त केले आजच्या वेगवान जीवनशैलीत आपण नकळत इतरांना दुखावतो. संवत्सरी हीच वेळ असते की आपण थांबून स्वतःकडे पाहतो आणि इतरांकडून क्षमा मागतो. हे आपल्याला मानसिक शांतीसह आत्मिक समाधानही देते. महिलांनी सांगितले संवत्सरीमुळे कुटुंबातील बंध अधिक दृढ होतात. पती-पत्नी, पालक-अपत्य किंवा भावंडांमध्ये झालेले छोटे मोठे वाद या क्षमायाचनेतून संपुष्टात येतात. सर्व भाविकांनी एकमताने सांगितले की पर्युषण पर्व संपले असले तरी त्यातून मिळालेली शिकवण वर्षभर आपल्या आचरणात उतरविणे हीच खरी साधना आहे. संयम, क्षमा, मैत्री आणि धर्माचरण हीच आपली खरी संपत्ती आहे. संवत्सरी महापर्वाने पर्युषण पर्वाचा समारोप होत असला तरी, या आठ दिवसांच्या साधनेतून मिळालेली शिकवण वर्षभरासाठी मार्गदर्शक ठरावी, असा सामूहिक संदेश देण्यात आला. या पर्वाने क्षमाभाव, संयम, त्याग, अहिंसा व धर्माचरण यांचे महत्त्व अधोरेखित केले. क्षमा ही केवळ औपचारिकता नसून ती जीवन जगण्याची पद्धत आहे.
संयमाने आचरण केल्यास मन शांत राहते, अहिंसेने समाजात सौहार्द जपला जातो, तर त्यागाने मानवी मूल्यांचे रक्षण होते. भाविकांनी सांगितले संवत्सरी हा एक दिवसाचा उत्सव नसून, तो आत्मशुद्धीचा प्रवास आहे. या पर्वातून आपण जर क्षमेचा भाव मनोमन रुजवला, तर आयुष्य अधिक समृद्ध, सौहार्दपूर्ण आणि शांततामय होईल. अखेर मिच्छामी दुक्कडम या पवित्र भावनेनेच संपूर्ण समाजाला बंधुभाव, समता आणि शांततेच्या वाटेवर नेण्याचा संदेश या महापर्वातून देण्यात आला.