प्रवचन – 15.07.2025 – प पू श्री मुकेश मुनीजी म सा – (बिबवेवाडी जैन स्थानक)
लाखो वर्षांपासून मानवतेपुढे एक प्रश्न उभा आहे – या मानवी जीवनाचे अंतिम प्रयोजन काय आहे?
मानव जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत एकच गोष्ट शोधतो – सुख! सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो धावत असतो, झटत असतो, प्रयत्न करत असतो – सुख मिळवण्यासाठी. ब्रह्मचारी संयम पाळतो, विद्यार्थी अभ्यास करतो, व्यापारी व्यवसाय करतो… पण तरीही खरी शांती आणि तृप्ती दूरच राहते.
भगवान महावीर स्वामी सांगतात – “या जगात डोंगराएवढं दु:ख आणि मोहरीच्या दाण्याएवढं सुख आहे.” आज जगात सुखसोयींची रेलचेल आहे, एक बटण दाबलं की हजारो सुविधा हजर होतात. पण त्या सुविधांमधून शाश्वत आनंद मिळतो का?
प्रत्येक जीव आनंदाची गुरुकिल्ली शोधत आहे. मुलंही खेळण्यातून, तरुण मौजमजेतून, वयोवृद्ध घर-संसारात सुख शोधत असतात. काहींनी पैशालाच सुख समजलं आहे. पण पैशातून मिळणारं सुख देखील अपूर्ण आणि क्षणिक ठरतं. कारण खरा आनंद – तो अंतर्मनात असतो, आपल्याच आत्म्यात असतो.
आपला आत्मा – हा आपला खरा मित्र देखील आहे आणि शत्रू देखील! तोच आपल्याला दु:खात लोटतो आणि तोच आपल्याला सुखाच्या शिखरावर पोहोचवतो.
आधुनिक युगात भौतिक सुखालाच जीवनाचे ध्येय समजले गेले आहे – खाणे, पिणे, फिरणे, ब्रँडेड कपडे, मौजमजा… पण हे सर्व क्षणिक आहे. धर्म म्हणजे साखर – जी जिभेला गोड लागत नाही, तर आत्म्याला अमृतगंध देते. म्हणूनच संत सत्संगाच्या माध्यमातून आपल्याला जागृत करतात – की उठ, चेत आणि आत्मदर्शनाकडे वळ.
भगवंत म्हणतात – या जगात सुख नाहीच आहे! जर कुणी म्हणालं, “मी पूर्ण आनंदी आहे,” तर त्या व्यक्तीचं नाव सांगता येईल का? कुणाला मूल नाही म्हणून दु:ख, कुणाकडे मूल आहे पण वागणूक चांगली नाही म्हणून दु:ख; कुणाकडे खूप पैसा आहे पण मनःशांती नाही; कुणी आजाराने त्रस्त आहे… सगळीकडे एकाच दु:खाची विविध रूपं.
या दु:खाचं मूळ काय? “मी” आणि “माझं” – ही अहंकार आणि आसक्तीची बीजं. यांनीच आत्म्याच्या आनंदावर अंधार घातला आहे. दुःखातून सुटका करून, आत्मिक सुखाच्या दिशेने जाण्यासाठी भगवान महावीरांनी तीन सोप्या मार्गांची शिकवण दिली आहे:
1. प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
दुःखातही सुखाचा शोध घ्या, कारण हे आपल्या मनाच्या दृष्टीवर अवलंबून आहे.
2. देण्याचा संस्कार जोपासा.
‘घेण्यात’ नेहमी अपेक्षा असते, पण ‘देण्यात’ समाधान असतं. देणाऱ्याच्या चेहऱ्यावरचं तेज वेगळंच असतं.
3. दोषारोप न करता आत्मपरीक्षण करा.
“हे माझ्या कर्माचं फळ आहे” – ही भावना आत्मबोधाच्या वाटेकडे घेऊन जाते.
विनय आणि नम्रता हीच खरी आध्यात्मिक सजावट आहे. ती अंगीकारली, की अभिमान नष्ट होतो, स्वाभिमान जागतो आणि आत्मा अहंकारमुक्त होतो.
आपल्याला ठरवायचं आहे – आपण कोणत्या सुखाच्या मागे धावणार आहोत? क्षणिक की शाश्वत?
सत्संग, स्वाध्याय आणि आत्मचिंतन – हेच आपल्याला अंतर्गत आनंदाच्या दालनात घेऊन जातील. कारण – सत्य सुख आत्म्यात आहे, बाहेर नव्हे!