प्रवचन – 25.08.2025 – प पू श्री मुकेश मुनीजी म सा – (बिबवेवाडी जैन स्थानक)
बर्याचदा लोकांच्या मनात ब्रह्मचर्य हा शब्द आला की केवळ स्त्री–पुरुष संबंध न ठेवणे, इतकेच त्याचे स्वरूप समजले जाते. पण प्रत्यक्षात ब्रह्मचर्याचा अर्थ फार व्यापक आहे.
ब्रह्मचर्य या शब्दाचा साधा अर्थ घेऊ तर ब्रह्म म्हणजे परब्रह्म, आत्मा; आणि चर्य म्हणजे आचरण. म्हणजेच आत्म्याशी संबंधित आचरण.
ब्रह्मचर्य म्हणजे – इंद्रियांवर विजय मिळवणे. त्यांना नियंत्रणात ठेवणे. इंद्रियांच्या विषयांमध्ये अडकून न पडणे. आत्म्याचे स्वरूप जाणून त्यात रममाण होणे. आपल्या अंतरिक ऊर्जेचा अपव्यय न करता ती ऊर्जा आत्म्याच्या उन्नतीसाठी वापरणे.
जेव्हा आपण इंद्रियांना स्वैर सोडतो तेव्हा मन विषयांमध्ये गुंतून जाते. डोळे सुंदर दृश्यात, कान गोड आवाजात, जिभेवर चविष्ट पदार्थात, नाक सुगंधात आणि त्वचा स्पर्शात गुंतते. हे गुंतणे म्हणजे आत्म्याचे बंधन. पण जेव्हा आपण त्या विषयांना नियंत्रणात ठेवतो, तेव्हा आत्मा स्वतंत्र होतो.
समजा एखाद्याच्या घरी भरपूर पैसा आहे. जर तो पैसा वाया घालवला, चुकीच्या ठिकाणी खर्च केला, तर घर उद्ध्वस्त होते. पण जर तो पैसा योग्य गुंतवणुकीत, योग्य उपयोगात आणला, तर कुटुंब सुखी राहते. त्याचप्रमाणे आपली अंतरिक ऊर्जा ही एक संपत्ती आहे. ती जर इंद्रियांच्या विषयांमध्ये वाया घालवली तर आत्मा दीन होतो. पण जर ती साधनेसाठी, आत्मजागृतीसाठी वापरली तर आत्मा प्रगती करतो.
१. मनाची स्थिरता – विषयांच्या मागे धावणारे मन नेहमी अस्थिर असते. ब्रह्मचर्य पाळणारे मन स्थिर, शांत व समाधानी असते.
२. आत्मशक्तीची वृद्धी – इंद्रियांचे आकर्षण टाळल्याने उर्जा व्यर्थ जात नाही. ती उर्जा साधना, जप, ध्यान यासाठी वापरली जाते.
३. शुद्ध विचारशक्ती – वासनामुक्त जीवनात चित्त निर्मळ होते. अशा निर्मळ चित्तातून शुद्ध व पवित्र विचार उद्भवतात.
४. आत्मसुखाची अनुभूती – विषयसुख क्षणिक आहे; पण आत्मसुख शाश्वत आहे. ब्रह्मचर्याने हे शाश्वत सुख अनुभवता येते.
काही लोक म्हणतात, “ब्रह्मचर्य तर साधू–साध्वींसाठी आहे, गृहस्थाला त्याचा काय उपयोग?” पण सत्य हे आहे की गृहस्थालाही ब्रह्मचर्य आपल्या परीने आचरता येते. दाम्पत्य जीवनातही मर्यादा ठेवून, संयम ठेवून, आत्मजागृती साधून ब्रह्मचर्याचे पालन करता येते. विचारांमध्ये शुद्धता आणा. चुकीचे विचार जसे डोक्यात आले तसे त्यांना थारा देऊ नका. वाणीवर नियंत्रण ठेवा. अशुद्ध, अश्लील किंवा वासनात्मक बोलणे टाळा. आचरण शुद्ध ठेवा. दैनंदिन जीवनात पवित्रतेचा आग्रह धरा. मोहक प्रसंगांपासून, इंद्रियांना भुरळ घालणाऱ्या वातावरणापासून शक्यतो अंतर ठेवा. सर्वांत महत्वाचे म्हणजे आत्म्याचे स्मरण ठेवा. “मी आत्मा आहे, शरीर नाही” हा भाव सतत जपला तर इंद्रिये आपोआप नियंत्रणात राहतात.
“ब्रह्मचर्य विना कोणतेही साधन पूर्णत्वाला जात नाही.” कारण इंद्रिय संयमाशिवाय साधना प्रगती करू शकत नाही. ब्रह्मचर्य हा केवळ नियम नाही, तो आत्मोन्नतीचा राजमार्ग आहे. जो इंद्रियांवर विजय मिळवतो, तोच खरा विजेता आहे. जो आत्म्यात रमतो, तोच खरा ब्रह्मचारी आहे.
“ब्रह्मचर्य हे आत्मसंपत्तीचे संरक्षण आहे आणि मोक्षमार्गाची पायरी आहे.”