Sagevaani.com /जालना: जैन समाजातील सर्वात पवित्र व महत्वाचा मानल्या जाणार्या पर्युषण महापर्वाच्या निमित्ताने जालना शहरात आयोजित धार्मिक सभेत प.पू. रमणिकमुनी म. सा. यांनी आपल्या ओजस्वी प्रवचनातून पर्युषणाचा खरा गाभा उलगडून दाखवला.सभागृहात भाविकांची मोठी उपस्थिती होती. प्रारंभी मंगलाचरण, भजन व जिनवाणी पठणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर प.पू. रमणिकमुनींनी आपल्या प्रवचनातून उपस्थितांना जीवनात आचारशुद्धी, क्षमा, संयम व आत्मपरिष्काराची आवश्यकता पटवून दिली. पर्युषण हा केवळ धार्मिक विधींचा किंवा बाह्य आडंबराचा विषय नाही. त्याचा खरा हेतू म्हणजे आत्म्याचे शुद्धीकरण. आत्म्याचे शत्रू बाहेर नसतात, तर ते आपल्या अंतःकरणात दडलेले असतात.
राग, द्वेष, मत्सर, अहंकार आणि लोभ हेच खरे आंतरिक शत्रू आहेत. त्यांचा पराभव करण्यासाठीच पर्युषण हे पर्व एक साधन आहे, असे त्यांनी सांगितले.ङ्गजिनवाणीने हृदय शुद्ध होतेफ प्रवचनात रमणिकमुनींनी शास्त्र आणि आचरण यातील संबंध स्पष्ट केला.दिल का बर्तन जिनवाणी से साफ होता है, असे प्रतिपादन करत त्यांनी सांगितले की, नुसते ज्ञान असून उपयोग नाही, तर त्या ज्ञानाची प्रत्यक्ष आचरणाशी सांगड असली पाहिजे. यावेळी त्यांनी द्वारका नगरीच्या विनाशाचा प्रसंग कथन करत यादवकुमारांचा अहंकार, मद्यपान आणि आंतरिक कलह यामुळे द्वारकेचा नाश झाला, बाहेरील शत्रू कारणीभूत नव्हते, हे स्पष्ट केले. यातून घर, समाज व राष्ट्रात ङ्गआंतरिक शत्रूफ निर्माण होऊ नयेत, असा इशारा त्यांनी दिला. पर्युषण पर्व म्हणजे तप, संयम व आत्मशुद्धीचे पर्व असल्याचे सांगून त्यांनी अनेक प्राचीन कथा भाविकांसमोर ठेवल्या.
भगवान महावीरांच्या प्रवचनाने प्रभावित होऊन श्रीकृष्णांच्या पट्टराणी पद्मावतींनी घेतलेली दीक्षा, तसेच रत्नावली व कंकावली साध्वींनी केलेल्या कठोर तपस्यांचे वर्णन या तपस्यांच्या प्रसंगांचे वर्णन करताना त्यांनी सांगितले की, साध्वींच्या शरीरातील रक्त व मांस आटून केवळ हाडांचे सांगाडे उरले, तरीही त्यांचे आत्मबल, धैर्य व संयम ढळला नाही. या कथांमुळे श्रोते भारावून गेले. इतिहासापुरतेच नव्हे, तर आजही जैन समाजात महान तपस्यांचे दर्शन घडते, असे सांगत रमणिकमुनींनी सध्या सुरू असलेल्या दोन तपस्यांचा उल्लेख केला. साध्वी पद्मश्रीजी महाराज : सलग सात दिवसांचा उपवास सुरू आहे. महासाध्वी हिमानीजी महाराज : मीठ न खाता केलेल्या आयंबिल तपस्येचा आज 57 वा दिवस पूर्ण झाला आहे.
दोन्ही साध्वींच्या दृढ आत्मबलाचे कौतुक करत रमणिकमुनींनी सांगितले की, अशा तपस्यांमुळे केवळ साध्वींचेच नाही तर संपूर्ण समाजाचे आत्मबल उंचावते व नव्या उर्जेचा संचार होतो. प्रवचनाच्या अखेरीस रमणिकमुनींनी सर्व भाविकांना स्पष्ट संदेश दिला – पर्युषण काळात फक्त बाह्य उपवास किंवा आयंबिल करून थांबू नका. खरी साधना म्हणजे मनातील कटुता व द्वेषभाव सोडून देणे, क्षमाभाव जागृत करणे आणि परस्परांत मैत्रीभाव प्रस्थापित करणे. त्यांनी विशेषतः संवत्सरी दिनी जास्तीत जास्त पोशद व सामायिक करण्याचे आवाहन केले. तसेच मिच्छामी दुक्कडम् या भावनेने एकमेकांची क्षमा मागण्याचे महत्व अधोरेखित केले. प्रवचनानंतर अनेक भाविकांनी असे मत व्यक्त केले की, रमणिकमुनींच्या उपदेशामुळे त्यांना आत्मपरिष्काराचा नवा मार्ग दिसला असून, कठोर तपस्यांच्या प्रेरणादायी उदाहरणांनी जीवनात संयम व क्षमा या गुणांचा स्वीकार करण्याची प्रेरणा दिली आहे.