प्रवचन – 18.08.2025 – प पू श्री मुकेश मुनीजी म सा – (बिबवेवाडी जैन स्थानक)
जैन धर्मात कर्म, आत्मा आणि मोक्ष यांचा अभ्यास करताना एक अत्यंत महत्त्वाचा शब्द वारंवार येतो – तो म्हणजे भाव. ‘भाव’ म्हणजे केवळ भावना किंवा मन:स्थिती नव्हे, तर आपल्या अंतर्मनाचा प्रवाह, आपली अंतःप्रवृत्ती आणि आपल्या आत्म्याची दिशा.
जैन धर्म सांगतो की, कर्मबंधनाची निर्मिती केवळ आपल्या कृतींनी होत नाही, तर आपल्या कृतीमागील भावनांनी होते. एकच कृती वेगवेगळ्या भावनेतून केली, तर तिचा कर्मपरिणाम वेगळा होतो.
एखाद्याला मदत केल्यावर अहंकाराने “मीच त्याला वाचवलं” अशी भावना आली, तर त्यात अहंकारबंधन तयार होतं, त्याच मदतीत करुणा आणि निःस्वार्थ भाव असेल, तर पुण्यबंधन होतं.
भावांचे २ प्रकार
• शुभ भाव: मैत्री, करुणा, क्षमा, दान, संयम, नम्रता यांसारख्या सद्गुणी भावना.
• अशुभ भाव: क्रोध, अहंकार, लोभ, मत्सर, ईर्षा, द्वेष यांसारख्या दूषित भावना.
जैन तत्त्वज्ञानानुसार, शुभ भाव सुद्धा कर्मबंधन निर्माण करतात, पण ते मोक्षमार्गाला सहाय्यभूत ठरतात. अशुभ भाव मात्र बंधनाला अधिक घट्ट करतात.
भाव आणि कर्मबंधन : कर्म हा आत्म्याला वेढून ठेवणारा पडदा आहे. हा पडदा कृतींपेक्षा जास्त भावनांनी जाड होतो. जो मनुष्य आपले भाव पवित्र ठेवतो, तो हळूहळू कर्मबंधन कमी करू लागतो.
दोन लोक मंदिरात अभिषेक करतात –
पहिला अभिषेक करतो स्पर्धेच्या भावनेने – “मी इतरांपेक्षा मोठा भक्त”.
दुसरा अभिषेक करतो आत्मशुद्धीच्या भावनेने – “हे माझ्या आत्मिक प्रगतीसाठी आहे”.
दोघांची कृती सारखी असली, तरी भावामुळे कर्मबंधनाचा परिणाम भिन्न.
एक व्यक्ती दान देते – लोकांमध्ये नाव व्हावं म्हणून दिलेलं दान – अहंकारबंधन आणि सेवाभावाने दिलेलं दान – पुण्यबंधन.
भावशुद्धीचे उपाय :
• स्वाध्याय: शास्त्रांचे अध्ययन करून योग्य विचारांची निर्मिती.
• प्रत्याख्यान: चुकीच्या भावनांची कबुली देऊन त्याग करणे.
• ध्यान: मन स्थिर ठेवून आत्म्याशी एकरूप होणे.
• सत्संग: योग्य मार्गदर्शक आणि संतसंपर्कात राहणे.
मोक्ष म्हणजे आत्म्याचे पूर्ण स्वातंत्.
अशुद्ध भाव आत्म्याला खाली खेचतात, शुद्ध भाव आत्म्याला वर नेतात.अखेरीस, शुभ-अशुभ दोन्ही भावांच्या पलीकडे जाऊन शुद्ध आत्मभाव प्राप्त करणे, हाच मोक्षमार्ग आहे.
“कृतीपेक्षा कृतीमागचा भाव महत्त्वाचा, भाव पवित्र ठेवला तर आत्मा उजळतो, भाव दूषित झाला तर आत्मा अंधारतो.” चला, आजपासून आपले भाव तपासूया, शुद्ध करूया आणि मोक्षमार्गाच्या दिशेने पाऊल टाकूया.