शिक्षण हे परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. कारण शिक्षणाच्या माध्यमातूनच व्यक्ती विकास, समाजविकास व राष्ट्रविकास साध्य होत असतो. याच उच्च उद्देशाने श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम (जैन गुरुकुल), नेमिनगर, चांदवड, जि. नाशिक ही शतक महोत्सवाकडे वाटचाल करणारी शैक्षणिक संस्था दिनांक 17 नोव्हेंबर 1928 पासून शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदानाचे कार्य करीत असून देशातील एक नावाजलेली अग्रगण्य शैक्षणिक संस्था आहे.
संस्थेचे संस्थापक कर्मवीर केशवलालजी हरकचंदजी आबड (पूज्य काकाजी) यांनी केवळ तीन विद्यार्थ्यांना घेऊन आश्रमाची मुहूर्तमेढ केली. शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे एक महत्वाचे साधन आहे अशी त्यांची धारणा होती. शिक्षणाचे महत्व कळावे म्हणून शिक्षणाचा प्रसार आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता असलेल्या अशा कालखंडात काकाजींनी ज्ञानदानाचा वसा हाती घेतला व अविरत प्रयत्नाने त्यांनी या जैन गुरुकुलाला ग्रामीण भागातील एक शैक्षणिक केंद्र बनविले. केवळ 3 विद्यार्थ्यांना घेऊन सुरु केलेल्या या शैक्षणिक संस्थेने अल्पावधीतच विस्मयकारक प्रगती केली आहे.
संस्थेमार्फत नेमिनगर, चांदवड येथ े बालवाडी, इंग्लिश मिडीयम स्कूल, प्राथमिक शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, किमान कौशल्यावर आधारित व्यावसायिक अभ्यासक्रम, कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ आणि कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज (बीएचएमएस व एम.डी. होमिओपॅथी), पदवी, पदविका व पदव्युत्तर औषध निर्माणशास्त्र (डी. फार्मसी, बी.फार्मसी, एम. फार्मसी), तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालय, एम.बी.ए., अध्यापक विद्यालय (डी.टी.एड.), लॉ कॉलेज, आयुर्वेद हॉस्पिटल, या विविध शैक्षणिक शाखांमधून सुमारे १५,००० विद्यार्थी-विद्यार्थिनी ज्ञानार्जन करीत असून सुमारे ९०० शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच संस्थेमार्फत चांदवड येथे सर्व सोयी व सुविधांनी सुसज्ज अशा पाच स्वतंत्र वसतिगृहांमध्ये सुमारे २००० विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या निवासाची व भोजनाची सोय करण्यात आलेली असून आजमितीस | ८५० विद्यार्थी विद्यार्थिनी या सुविधेचा लाभ घेत आहेत. संस्थेत राज्यातीलच नव्हे तर देशाच्या विविध राज्यातून दरवर्षी हजारो विद्यार्थी प्रवेशित होतात. येथील कन्या वसतिगृह देशातील एक शिस्तबद्ध व आदर्श
कन्या वसतिगृह म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पालक दरवर्षी येथे प्रवेश घेण्यासाठी गर्दी करतात.
एकसंध, कर्तव्यनिष्ठ, स्वावलंबी व भयमुक्त आदर्श समाजाची निर्मिती हेच येथील शिक्षणाचे ध्येय मानले जाते. या संस्थेतून नैतिकता, प्रामाणिकपणा व श्रमनिष्ठेचे धडे घेऊन बाहेर पडलेले असंख्य माजी विद्यार्थी देशाच्या कानाकोपऱ्यात डॉक्टर्स, इंजिनियर्स, व्यापारी, शेतकरी, अधिकारी व समाजसेवक म्हणून आदर्श आणि यशस्वी जीवन जगत आहेत. अर्थात निर्व्यसनी, स्वाभिमानी व चारित्र्यसंपन्न देशभक्त नागरिक तयार व्हावेत ही या संस्थेची तळमळ आहे. कौटुंबिक जबाबदारीबरोबरच सामाजिक व राष्ट्रीय कर्तव्ये पार पाडण्याचे सामर्थ्य विद्यात निर्माण व्हावे, असा या संस्थेने सदैव प्रयत्न केला आहे.
संस्थेचे पदाधिकारी, संस्थेच्या विविध विभागांचे प्राचार्य, प्राध्यापक राज्यस्तरीय, विद्यापीठ स्तरावरच्या विविध महत्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित झालेले आहेत. येथील विविध व्यावसायिक पदविका व पदवी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रोजेक्ट राष्ट्रीय स्तरावरच्या विविध स्पर्धेत प्रथम क्रमांकाने सन्मानित झालेले आहेत. येथील विविध शाखेतील विद्यार्थी दरवर्षी विद्यापीठाच्या मेरीट लिस्टमध्ये अव्वल स्थानी असतात. एमपीएससी व युपीएससी सारख्या स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून दरवर्षी अनेक विद्यार्थी मोठ्या शासकीय पदांना गवसणी घालत असतात.
संस्थेच्या सध्याच्या 28 एकर कॅम्पसपासून जवळच नव्याने घेतलेल्या 20 एकर जागेत नवीन मेडिकल हब निर्मितीचे कार्य प्रगती पथावर असून या नवीन कॅम्पसमध्ये बीएचएमएस कॉलेज व हॉस्पिटल, बीएएमएस कॉलेज व हॉस्पिटल, स्वतंत्र कन्या वसतिगृह, विद्यार्थी वसतिगृह, स्टाफ क्वार्टर्स, जॉगींग ट्रॅक, विविध क्रिडा सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. लवकरच हा प्रोजेक्ट साकार होणार आहे. त्यामुळे चांदवड व जिल्ह्यातील नागरिकांना विस्तारित वैद्यकिय सुविधांचा लाभ मिळणार आहे. भविष्यात फिजिओथेरपी, नर्सिंग कॉलेज, एमबीबीएस, रेसडिन्शियल पब्लिक स्कूल इत्यादी नवीन अभ्यासक्रम सुरु करण्याचा संस्थेचा मानस असून लॉ कॉलेज अंतर्गत सुद्धा काही नवीन कोर्सेस सुरु केले जाणार आहेत.
संस्थेच्या विकासात समाजबांधव, मान्यवर दानदाते, निस्वार्थ व समर्पित भावनेने कार्यरत सर्व विश्वस्त व प्रबंध समिती सदस्य, विद्यार्थी, पालक, समर्पित व उच्च विद्याविभूषीत शिक्षक-शिक्षकेतर सेवक यांचा मोलाचा सहयोग राहिला आहे. संस्था त्यांची सदैव ऋणी राहील. सर्वांच्या सहयोगाने स्वतंत्र जैन विद्यापीठाचे संस्थेचे स्वप्न लवकरच साकार होईल यात शंका नाही.
(बेबीलाल के. संचेती) अध्यक्ष, विश्वस्त मंडळ एसएनजेबी (जैन गुरुकुल), चांदवड