जालना (प्रतिनिधी) : जालना शहरातील गुरु गणेश तपोधाम येथे आज सामूहिक क्षमा याचनाचा भव्य व पवित्र सोहळा मोठ्या श्रद्धा, भक्ती व उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. या प्रसंगी प.पू. रमनिकमुनिजी म.सा. यांच्या सान्निध्यात भाविकांनी एकमेकांना मिच्छामी दुक्कडम् म्हणत वैरभाव विसरून मैत्री, शांती आणि सद्भावनेचा संदेश दिला. सकाळपासूनच तपोधाम परिसरात भाविकांची गर्दी उसळली होती. स्त्री-पुरुष, युवक-युवती आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहात सहभागी होत क्षमा धर्माची परंपरा जपली. सामूहिक प्रार्थना, भजन व आत्मचिंतनाने वातावरण अधिक पवित्र झाले. आपल्या प्रेरणादायी आशीर्वचनांत प.पू. रमनिकमुनिजी म.सा. यांनी सांगितले की, क्षमाशीलता हेच धर्माचे खरे लक्षण आहे. क्षमा मागणे म्हणजे कमजोरी नसून ती आत्मशुद्धीची दिशा आहे. कटुता, वैरभाव, मत्सर व अहंकार या मानवी दुर्बलता आहेत. त्या क्षमाशीलतेनेच दूर होतात. क्षमा दिल्याने हृदय निर्मळ होते आणि समाजात सौहार्द, बंधुता व शांती नांदते.
या सोहळ्यात उपस्थित डॉ. धरमचंद गादिया, स्वरूपचंद ललवानी, जयप्रकाश रूणवाल, आनंद सुराणा, विनय कोठारी, विजयराज सुराणा, हस्तीमल बंब, कचरूलाल कुंकुलोळ, सौ. आरती बरलोटा आणि सौ. लूनिया यांनीही आपल्या भाषणातून क्षमा धर्माचे महत्व स्पष्ट केले. त्यांनी प्रतिपादन केले की, जैन परंपरेतील क्षमा ही केवळ एक धार्मिक विधी नसून ती जीवन जगण्याची पद्धत आहे. क्षमाशीलतेने समाजात तणाव, वाद आणि अहंकार नष्ट होऊन ऐक्य, करुणा आणि मैत्री वृद्धिंगत होते. क्षमा ही अध्यात्मिक उन्नतीसाठी तसेच समाजातील ऐक्य टिकवण्यासाठी अनिवार्य आहे. सोहळ्याच्या शेवटी उपस्थित भाविकांनी गुरुंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. नंतर सर्वांनी परस्परांची क्षमा मागत मिच्छामी दुक्कडम् हा मंगलोच्चार केला आणि क्षमा धर्माचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून जगासमोर मांडला. या कार्यक्रमामुळे गुरु गणेश तपोधाम परिसरात तसेच संपूर्ण जालना शहरात अध्यात्मिक व सकारात्मक वातावरण निर्माण झाले.