प्रवचन – 31.07.2025 – प पू श्री मुकेश मुनीजी म सा – (बिबवेवाडी जैन स्थानक)
आत्मा अनंत काळापासून संसाराच्या चक्रामध्ये भटकत आहे. कधी मानवगती, कधी देवगती, कधी तिर्यंचगती, तर कधी नरकगती — या चार गतिंमधून जन्म घेत जन्मो जन्मी पुनःपुन्हा कर्म भोगतो आहे आणि नव्या कर्मांची गुंफण करत आहे.
अज्ञानामुळे आत्म्याचा खरा उद्देश विसरला गेला आहे. म्हणूनच तो जन्म आणि मृत्यू यांच्या चक्रामध्ये अडकून राहिला आहे. पण जेव्हा नम्रतेपूर्वक शरणागती पत्करून सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्राप्त केलं जातं, तेव्हा मुक्तीच्या दिशेचा निर्धार आणि दिशा दोन्ही स्पष्ट होतात.
उदाहरणार्थ, जर पुण्याहून मुंबईला जायचं असेल, पण रस्त्याचं ज्ञान नसेल, तर वाट चुकण्याची शक्यता अधिक असते. त्याचप्रमाणे मोक्ष गतीकडे जाण्यासाठी योग्य मार्गदर्शन, म्हणजेच आत्मज्ञान, अत्यंत आवश्यक आहे. आणि हे ज्ञान फक्त सद्गुरूंनी सांगितलेल्या शुद्ध मार्गावरूनच मिळू शकतं.
ज्ञानाबरोबरच आचारसुद्धा शुद्ध असायला हवा. आचार असा असावा की तो आत्म्याला क्रोध, मान, माया, लोभ या कषायांपासून वाचवेल. जेणेकरून आत्मा या चार गतिंमधून सुटून मोक्षगतीकडे जाऊ शकेल.
शुद्ध चारित्र्याचे आठ प्रकार सांगितले गेले आहेत, जे जो कोणी आत्मसात करतो, तो निश्चितच मोक्षमार्गावर पुढे जातो. या मार्गावर मन, वाणी आणि शरीर या तिन्हींचं सामंजस्य अत्यावश्यक आहे.
फक्त विचार करूनसुद्धा पापकर्माची गुंफण होते. यामध्येही सर्वात महत्त्वाचं साधन म्हणजे “मन”. कारण सर्वप्रथम कोणताही विचार मनातच येतो. नंतर तो शब्दरूप धारण करतो आणि वाणीमधून बाहेर पडतो. त्यानंतर शरीराच्या माध्यमातून कृतीत येतो.
जर मनातील विचार शुद्ध असेल तर फळही शुद्ध आणि मंगलकारक मिळतं. पण विचार चुकीचा असेल, तर त्याचे परिणाम दुःखदायकच असतात.
म्हणूनच आत्म्याला मोक्षाकडे घेऊन जाण्यासाठी प्रथम ज्ञान आवश्यक आहे, पण त्याचबरोबर आचार आणि विचारांचीही शुद्धता हवी. ज्ञान, शुद्ध चारित्र्य, संयम आणि सम्यक दृष्टी — हे जर आत्मसात झाले, तर आत्मा भवबंधनातून मुक्त होऊन मोक्षगतीकडे निश्चितच प्रस्थान करू शकतो.