प्रवचन – 16.07.2025 – प पू श्री मुकेश मुनीजी म सा – (बिबवेवाडी जैन स्थानक)
मानवी जीवनामध्ये परिग्रहाचा अतिरेक हा दुःखाचे मुख्य कारण आहे. जसे जसे लाभ वाढतो, तसतसे लोभही वाढत जातो. संपत्ती मिळवणं आवश्यक आहे, पण तिचा संग्रह न करता, जर ती दानधर्मात वापरली गेली, तर त्यातून अपार पुण्याची कमाई होते.
एक उदाहरण घ्या – एखाद्या वाहनाला ब्रेक नसेल, तर ते असंतुलित होऊन अपघात होतो. तसेच, जर आपल्या जीवनात मर्यादा नसेल, तर जीवनही दिशाहीन आणि अस्तव्यस्त होऊन जातं. जीवनाचा खरा हेतू हरवून बसतो.
मर्यादा नसल्यास, आपण वापरत नसलेल्या गोष्टींचाही दोष आपल्यावर येतो. पण जिथे जीवनात मर्यादा असते, तिथे विषय वासनांचे अंधकार आपल्यात प्रवेश करत नाहीत.
“ज्या वस्तूला आपण जितकं सोडतो, ती तितकीच आपल्या जवळ येते.”
ही जीवनातील एक सुंदर सत्यता आहे. म्हणून, मनुष्याने संपत्ती मिळवण्याबरोबरच तिचं दान कसं करावं हेही शिकायला हवं. पण आजच्या युगात मनुष्य धनाच्या मागे डोळे झाकून धावत आहे – ज्याचा परिणाम म्हणजे मानसिक असंतुलन, ताणतणाव आणि असंतुष्ट जीवन.
यासाठीच भगवान महावीरांनी आपल्या अनुयायांना अणुव्रत दिले – हे अणुव्रत म्हणजेच संयमाचे मूल्यमापन करणारे मार्गदर्शक आहेत. या अणुव्रतांवर आधारित मर्यादित जीवनशैली हीच खऱ्या सुखाचे रहस्य आहे. कारण ज्या व्यक्ती जीवनातील मर्यादांचा भंग करतो, तो कधीच खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकत नाही.
जैन धर्मातील प्रत्येक स्तोत्र, प्रत्येक मंत्रामध्ये अद्भुत अशा आध्यात्मिक शक्तीचा समावेश आहे. जर त्या मंत्रांचा आत्मसात भावनेने उच्चार केला, तर जीवनातील प्रत्येक संकट, प्रत्येक उपसर्ग दूर होऊ शकतो.
या संसारातील प्रत्येक वस्तू नश्वर आहे – अगदी आपले शरीरसुद्धा. कोणीही काही घेऊन आलेला नाही आणि कोणालाही काही घेऊन जाता येणार नाही. तरीही आपण आयुष्यभर या शरीराच्या मोहात अडकून राहतो.
आपल्याला संयम स्वीकारायचा असतो, पण संसार सुटत नाही. कारण हा संसार म्हणजे एका पाण्याच्या थेंबासारखा आहे – क्षणभंगुर. म्हणूनच भगवान म्हणतात की, “ज्याप्रमाणे आपण शरीरावर प्रेम करतो, त्याचप्रमाणे परमात्म्यावर प्रेम करू लागलो, तर जीवन नक्कीच धन्य होईल.” जो माणूस नश्वर गोष्टींत परमेश्वराला शोधतो, तोच पुढे परमात्म्याचं स्वरूप प्राप्त करतो.
आपण जीवनाला “बेहतर” बनवायला हवं, “बदतर” नव्हे. अपरिग्रह आणि संयम या द्वारेच हे शक्य आहे.