जालना : जालना शहरातील जैन समाजात सध्या सुरू असलेल्या पर्यूषण पर्वाचा आज पंचवा दिवस मोठ्या श्रद्धा, भक्तिभाव आणि उत्साहाने साजरा करण्यात आला. सकाळच्या मंगलाचरणाने व अंतःकृत दशांग सूत्र पठणाने या पावन दिवसाचा शुभारंभ झाला. आजच्या पंचम दिनाचा मुख्य आकर्षण ठरले प. पू. रमणिकमुनीजी म.सा. यांचे ओजस्वी प्रवचन. आपल्या गाढ ज्ञानाने आणि प्रभावी वाणीने त्यांनी अर्जुनमाली चरित्र कथन करून भाविकांना जीवनातील संयम, क्षमा आणि आत्मशुद्धीचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून दिले. मुनीश्रींनी सांगितले की अर्जुनमाली हा सुरुवातीला साधा माळी होता. तो दररोज आपल्या बागेतून सुंदर फुले तोडून कुलदेवतेची भक्तिभावाने पूजा करत असे. परंतु एका दुर्दैवी प्रसंगाने त्याचे आयुष्य अंधःकारमय झाले. काही दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी त्याच्या पत्नीवर कुदृष्टी टाकली आणि मंदिरात षड्यंत्र रचले. त्या अपमानामुळे संतापाच्या भरात अर्जुनमालीने हिंसेचा मार्ग स्वीकारला. कुलदेवतेशी प्रार्थना करताच यक्षाच्या कृपेने त्याला अलौकिक शक्ती प्राप्त झाल्या. त्या शक्तींच्या जोरावर अर्जुनमालीने सूडबुद्धीने प्रतिदिन सहा पुरुष आणि एका स्त्रीची हत्या करण्याची प्रतिज्ञा केली. त्याने सलग 163 दिवस हे कृत्य सुरू ठेवले. अशा प्रकारे त्याच्या हातून तब्बल 1141 निरपराध जीवांचा बळी गेला.
या सततच्या हत्याकांडामुळे संपूर्ण राजगृह नगरी भयभीत व दहशतीने ग्रासलेली होती. प्रत्येकाच्या मनात भीतीचे सावट होते आणि लोकांना आपल्या जिवाची पर्वा उरली नव्हती. अशा काळात सुदर्शन नावाच्या एका श्रावकाने भगवान महावीरांचे दर्शन घेण्याचा संकल्प केला. तो अर्जुनमालीच्या तावडीत सापडला, पण भीती न बाळगता त्याने नवकार मंत्र जपायला सुरुवात केली. त्या मंत्रशक्तीसमोर अर्जुनमालीच्या शरीरातून यक्षाची शक्ति निघून गेली/ सुदर्शनाने त्याला आधार दिला व भगवान महावीरांच्या समवसरणात नेले. तेथे जिनवाणीचे पावन उपदेश ऐकताच अर्जुनमालीच्या अंतःकरणात आमूलाग्र परिवर्तन झाले. त्याने आपल्या हिंसक जीवनाचा त्याग करून संयम, क्षमा आणि तपश्चर्येचा मार्ग स्वीकारला. सहा महिने संयमपूर्वक साधना केली, संथारा साधना अंगीकारली आणि अखेरीस मोक्ष प्राप्त केला.
क्रोध, कामना आणि लोभामुळे माणूस अध:पाताकडे जातो!
प. पू. रमणिकमुनीजी म.सा. यांनी स्पष्ट केले की क्रोध, कामना आणि लोभ या तीन गोष्टी आत्म्याच्या शत्रू आहेत. क्रोधामुळे विवेक नष्ट होतो, माणूस चुकीचे निर्णय घेतो आणि हिंसा, वाद यांकडे झुकतो. कामना माणसाला असंतुष्ट करते. इच्छा पूर्ण झाली नाही तर दु:ख, तर पूर्ण झाली तरी नवी इच्छा निर्माण होते. परिणामी माणूस अंतहीन धावपळीत अडकतो. लोभामुळे माणूस इतरांचा विचार विसरतो आणि फक्त स्वार्थासाठी जगतो. लोभ जितका वाढतो तितका समाधान हरवतो. यामुळे माणूस सतत अध:पात, दुःख आणि अशांतीच्या मार्गावर जातो. पण सद्गुरूंच्या सान्निध्यात व धर्माच्या प्रभावामुळे मनुष्याचे वर्तन बदलू शकते. अर्जुनमालीच्या जीवनातील बदल याचेच प्रत्यक्ष उदाहरण आहे. मुनीश्रींनी प्रवचनात सांगितले की पर्यूषण पर्वाला आत्मिक आरोग्य शिबिर म्हणता येईल. जसे शारीरिक आजार बरे करण्यासाठी आपण औषधे घेतो, तपासण्या करतो तसेच आत्म्याच्या आजारांवर (कषाय – क्रोध, मान, माया, लोभ) उपचार करणे गरजेचे आहे. या आठ दिवसांत उपवास, तप, आराधना, प्रतिक्रमण व स्वाध्याय करून आत्म्याची धूळ धुवून टाकली पाहिजे. हा काळ म्हणजे भूतकाळातील चुका मान्य करून त्यांचे प्रायश्चित्त घेण्याचा, वर्तमानात संयम पाळण्याचा आणि भविष्यकाळात योग्य संकल्प करून नवे जीवन घडवण्याचा आहे.
मुनीश्रींनी भाविकांना जागरूक करताना सांगितले – जीवन अत्यंत क्षणभंगुर आहे. पुढचे पर्यूषण आपल्याला लाभेलच याची खात्री देता येत नाही. म्हणून उद्यावर न टाकता आजच आत्मशुद्धीचा प्रयत्न करावा. माणसाकडे धन, पदवी, सत्ता, कुटुंब सर्व काही असले तरी पुढचा क्षण निश्चित नाही. मृत्यू हा अटळ आहे, पण त्याची वेळ अज्ञात आहे. त्यामुळे पर्यूषण पर्वाची प्रत्येक संधी ही आत्मकल्याणाची अमूल्य संधी आहे. संयम, क्षमा, दया आणि सत्य या गुणांचे आचरण करत प्रत्येक क्षण उपकारक करणे हाच खरा धर्म आहे. आजच्या दिवशी झालेल्या धार्मिक कार्यक्रमात महासाध्वी हिमानीजी महाराज यांचा 55 वा आयंबिल अत्यंत भक्तिभावाने पार पडला. या कठीण तपश्चर्येतून त्यांनी आत्मसंयम, आत्मशुद्धी आणि तपोबल यांचे दर्शन घडवले. उपस्थित भाविकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्याकडून प्रेरणा घेतली. तसेच, सुनती भाई ताराचंदजी नखत, गंगाखेड, तसेच डॉ. सोनम आणि डॉ. जितेंद्र रुनवाल यांनी आपला 24 वा उपवास यशस्वीरीत्या पूर्ण केला. त्यांच्या या साधनेने जैन समाजात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.
अशा तपश्चर्या हे जैन धर्मातील तप, संयम आणि आत्मकल्याणाचे जिवंत उदाहरण असल्याचे मुनीश्रींनी नमूद केले. उपस्थित भाविकांनीही दान, शील, तप, भावना आणि विवेकपूर्ण आदान-प्रदान यांद्वारे धर्मपालनाचा अनुभव घेतला. भक्तांमधील सहकार्य आणि सेवाभावामुळे संपूर्ण कार्यक्रम अधिक सुव्यवस्थित आणि मंगलमय झाला. धर्मपालन केवळ मंदिर, उपासना आणि प्रवचनापुरते मर्यादित नसून, घरगुती जीवनातही संयम, सुव्यवस्था आणि धार्मिकतेचे तत्त्व आचरणात आणणे तितकेच आवश्यक आहे. दैनंदिन जीवनात सत्य, अहिंसा, संयम आणि क्षमा यांचा अंगीकार केला तर समाजातही शांती आणि ऐक्य निर्माण होईल. संध्याकाळच्या वेळेस मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. प्रतिक्रमण कार्यक्रमात शेकडो महिला-पुरुष सहभागी झाले. शांत, सौम्य वातावरणात सर्वांनी सामूहिकपणे प्रायश्चित्त घेऊन भूतकाळातील चुका स्वीकारल्या आणि आत्मशुद्धीचा संकल्प केला.
यानंतर झालेल्या भक्तिभावपूर्ण भजनने वातावरण अधिक मंगलमय झाले. भजनांमधील स्वर, घंटानाद आणि नवकार मंत्र चा सामूहिक जप यामुळे संपूर्ण परिसर अध्यात्मिकतेने भारावून गेला. महिला मंडळांनी सुंदर स्वरांतून स्तवन आणि गीते सादर केली, तर लहान मुलांनी जैन धर्मावर आधारित लघुनाटिका आणि गाणी सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. युवकांनी शिस्तबद्ध सेवा व आयोजनाची जबाबदारी सांभाळून कार्यक्रम अधिक सुंदर आणि सुयोजित बनवला. या कार्यक्रमात लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतल्यामुळे समाजात एकोपा, भक्तिभाव आणि आध्यात्मिक एकात्मता जाणवली. संपूर्ण जालना जैन समाज ध्यान, जप, आराधना व सामूहिक भक्तीच्या माध्यमातून आत्मकल्याणात तल्लीन झाला होता. सर्वत्र केवळ शांती, आनंद आणि अध्यात्मिकतेचा दरवळ अनुभवायला मिळत होता.




