जालना : शहरात सुरू असलेल्या पर्यूषण पर्वात आज सहावा दिवस उत्साहात व श्रद्धाभावाने साजरा करण्यात आला. प्रातःकाळी मंदिरात सामूहिक मंगलाचरण व अंतःकृत दशांग सूत्र पठणाने वातावरण पवित्रतेने भारून गेले. या मंगल प्रसंगी प.पू. रमणिकमुनीजी म.सा. यांच्या प्रवचनाचा भाविकांना लाभ झाला. आजच्या प्रवचनाचा विषय होता कल्पसुत्र चरित्रातून संयम व त्यागाचे दर्शन घडले. प.पू. रमणिकमुनीजी म.सा. यांनी सांगितले की, एयवंता कुमारांचा जन्म एका समृद्ध व ऐश्वर्यशाली राजघराण्यात झाला. लहानपणापासूनच त्यांच्या भोवती वैभव, सत्तेचा झगमगाट आणि भोगसुखांची रेलचेल होती. तरीदेखील त्यांच्या हृदयात वैराग्य आणि संयमाची बीजे रोवलेली होती.
राजसिंहासनाच्या मोहिनीला दूर ठेवून त्यांनी धर्ममार्गाचा स्वीकार केला. आपल्या जीवनाला उच्च आध्यात्मिक उद्दिष्ट देत त्यांनी सांसारिक सुखांचा त्याग केला.
साध्या जीवनशैलीत राहून, तप, संयम आणि धर्माचरणाला त्यांनी जीवनाचे केंद्रस्थान बनवले. एयवंता कुमारांच्या जीवनाचा पाया हा तीन मूलभूत तत्त्वांवर आधारलेला होता त्याग, संयम आणि सत्यनिष्ठा. त्यांनी भोगविलास आणि ऐश्वर्य सोडून साधेपणा व मर्यादित जीवन निवडले. सांसारिक मोह, माया, कामना यांच्या ओढीत न वाहता त्यांनी आत्मकल्याणाला प्राधान्य दिले. जीवनातील प्रत्येक क्षणी त्यांनी संयमाचा अवलंब करून आत्मशुद्धी साधली. त्यांचा त्याग हा फक्त बाह्य नव्हता, तर अंतःकरणातील मोह, अहंकार आणि लोभ यांचाही होता. एयवंता कुमारांच्या चरित्रात धर्माभिमान आणि सहनशीलतेची विलक्षण छटा दिसते. संकटे, प्रलोभने आणि आव्हाने यांचा सामना करताना त्यांनी कधीही धर्ममार्गाचा त्याग केला नाही. त्यांच्या जीवनातून सहनशीलता, प्रामाणिकपणा आणि धर्माशी अखंड निष्ठा दिसून येते. त्यांनी दाखवून दिले की, परिस्थिती कितीही प्रतिकूल असो, धर्माचरणात कधीही ढळता कामा नये. खरा आनंद कुठे आहे? प्रवचनादरम्यान मुनिश्रींनी स्पष्टपणे सांगितले खरा आनंद हा बाह्य भोगसुखात किंवा ऐहिक ऐश्वर्यात नाही. तो आत्मकल्याणात आणि अंतःकरणाच्या शुद्धीत आहे. जीवनाला योग्य दिशा द्यायची असेल तर त्याग, संयम आणि नीतिमूल्यांचा स्वीकार करावा लागतो.
म्हणजेच, वैभवाने भरलेले जीवन क्षणभंगुर आनंद देऊ शकते, पण संयम आणि धर्माचरणातून मिळणारा आनंद हा चिरंतन आणि शाश्वत असतो. आपल्या प्रवचनात प.पू. रमणिकमुनीजी म.सा. यांनी एयवंता कुमारांच्या जीवनचरित्राला आजच्या परिस्थितीशी जोडून भाविकांना महत्त्वाचा संदेश दिला. ते म्हणाले की, आजचा मनुष्य पैसा, पद आणि प्रतिष्ठेच्या मागे अंधपणे धावत आहे. सुखसोयी, भौतिक साधने आणि ऐश्वर्य मिळवण्याच्या शर्यतीत तो इतका रमला आहे की त्याचे मानसिक संतुलन व अंतरिक शांती हरवत चालली आहे. भौतिकतावादी जीवनशैलीमुळे समाज हळूहळू नैतिक मूल्ये, संस्कार आणि आध्यात्मिक जाणीवा विसरत आहे. नाती तुटत आहेत, विश्वास कमी होत आहे आणि ताणतणाव, असंतोष व असुरक्षितता वाढत आहे. अशा वेळी एयवंता कुमारांचे जीवनचरित्र हे जणू दिशादर्शक दीपस्तंभाप्रमाणे कार्य करते. सांसारिक ऐश्वर्य असूनही त्यांनी त्याग, संयम आणि धर्माभिमानाचा मार्ग निवडला. आजचा समाज जर त्यांचा आदर्श अंगीकारेल, तर त्याला हरवलेली शांती, स्थैर्य आणि समाधान परत मिळू शकते. मुनिश्रींनी सांगितले जीवनात खरी शांतता व समाधान हे पैशात किँवा वैभवात नाही, तर संयम व त्यागातूनच प्राप्त होते.
मोह-मायेपासून अलिप्त राहून धर्ममार्गावर दृढ राहणे हेच आत्मिक उन्नतीचे खरे साधन आहे. त्यांनी उपस्थितांना आवाहन केले की, भौतिकतेपेक्षा अध्यात्माकडे वळावे, नीतिमूल्यांचे पालन करावे आणि साधेपणात समाधान शोधावे.आजच्या प्रवचनासाठी सकाळपासूनच जालन्यातील जैन मंदिराच्या परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. पहाटेपासूनच मंदिरात भाविकांचा ओघ सुरू झाला आणि प्रवचनाच्या वेळी संपूर्ण सभागृह खचाखच भरलेले होते. मंदिराच्या प्रांगणात पवित्रता, शिस्त आणि भक्तिभावाचे वातावरण अनुभवायला मिळत होते. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक सर्वच वयोगटातील लोकांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. काही भाविकांनी मौन पाळले होते तर काही ध्यानधारणेत मग्न होऊन आत्मशुद्धीचा अनुभव घेत होते. प्रवचनादरम्यान वातावरणात जय जिनेंद्र च्या घोषणांनी आणि अध्यात्मिक ऊर्जेच्या कँपनांनी सर्वत्र एक विलक्षण पवित्रता निर्माण झाली. मुले आणि तरुण वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता.
त्यांनी शिस्तबद्ध बसून प्रवचन ऐकले आणि त्यातून मिळणारे संस्कार मनाशी घट्ट केले. अनेक ज्येष्ठांनी प्रवचन ऐकताच डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळले, तर महिलांनी मंगलध्वनी करत सभागृहाला भक्तिभावाने गाजवले. प्रवचनाच्या शेवटी झालेल्या सामूहिक मंगल पाठ ने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. मंदीरात गुंजणार्या त्या मंगल ध्वनींनी वातावरण पावन झाले. भाविकांच्या चेहर्यावर आध्यात्मिक समाधान, प्रसन्नता आणि अंतःशांतीचे तेज झळकत होते. संपूर्ण सभागृहात अशी अनुभूती होती की जणू प्रत्येकाला आत्मजागृतीचा स्पर्श झाला असून, जीवन अधिक संयमी व पवित्र करण्याची नवी प्रेरणा मिळाली. जालना गुरु गणेश धाम येथे तपस्या- पर्यूषण पर्व निमित्त जालना गुरु गणेश धाम येथे समाज बांधवांकडून विविध तपस्या चालू आहेत.
आज सहा उपवास करणार्यांमध्ये सम्यक राजेंद्रकुमार रुणवाल, सौ रीता सुनील कुमार बोरा, बीबीवाले, सौ सूरजीबाई मोहनलाल राका (चेन्नई), सचिन गौतमचंद लोढा, आशीष कुमार विजयकुमार श्रीश्रीमाल, सौ नेहा रोहितकुमार राका, आशीष युवराज बागरेचा (देवगाव रंगारी), सौ सपना आशीष बागरेचा, अनिलकुमार कचरूलाल मुथा, दीपक वीरेंद्रकुमार रुणवाल, सौ युक्ता लोकेश ओस्तवाल यांचा समावेश आहे. आज सात उपवास सौ भारती सुरेशचंद श्रीश्रीमाल, श्रीमती रेखा नितीनकुमार कटारिया, सौ ललिता कमलेश मरलेचा (चेन्नई), सौ उषाबाई शांतीलाल बोरा, आकर्षकुमार विजयकुमार जांगडा यांनी केले आहेत. आज नऊ उपवास श्री कचरूलालजी किशनलालजी अलीझार. आज 25 उपवास डॉ. सोनल डॉ. जितेंद्रकुमार रुणवाल व श्री सुमित ताराचंदजी नखत (गंगाखेड) यांनी केले आहेत. नवा संदेश, नवी प्रेरणा पर्यूषण पर्वाचा प्रत्येक दिवस भाविकांना नवी शिकवण देतो आहे. षष्ठ दिनी झालेले हे प्रवचन संयम, त्याग व धर्माचरणाचे महत्त्व अधोरेखित करून गेले. एयवंता कुमारांच्या आदर्श चरित्रातून आत्मजागृतीचा नवा संदेश मिळाला. भाविकांनी व्यक्त केले की, या प्रवचनातून जीवनाला सकारात्मक दिशा देणारी प्रेरणा मिळाली.