प्रवचन – 22.07.2025 – प पू श्री मुकेश मुनीजी म सा – (बिबवेवाडी जैन स्थानक)
या संसारात डोळ्यांना दिसणारे बहुतांश वास्तव दुःखमय आहे. खऱ्या अर्थाने आनंदी व्यक्ती कोण आहे? मूल नसेल म्हणून दुःख, मूल होऊनही दुःख, पैसा नसेल म्हणून दुःख, पैसा असूनही मनःशांती नाही. आरोग्याच्या समस्या, नातेसंबंधातील ताण, असंख्य अपेक्षा आणि अपुऱ्या गोष्टी — हेच जीवनाचे वास्तव झाले आहे.
कधी संकटं आली, की आपण देव आठवतो. पण हे सगळं दुःख का निर्माण होतं? कारण आहे – “मी” आणि “माझे”. या भावना म्हणजेच अहंकार आणि आसक्तीची बीजं. जितकं ‘मी-माझे’ वाढत जातं, तितकं दुःख वाढतं.
भगवंत महावीर स्वामी म्हणतात — खरा आनंद तुमच्या अंतरात्म्यात आहे, पण तुम्ही तो बाहेर शोधत आहात. तो आतला आनंद उलगडण्यासाठी फक्त आत्मद्वार उघडण्याची गरज आहे.
दुःखातून मुक्त होण्याचे तीन मार्ग:
१) मानसिकतेचा दृष्टीकोन बदला:
प्रत्येक प्रसंगात सुख पाहण्याचा दृष्टिकोन अंगीकारा. जीवनातील घटना बदलता येणार नाहीत, पण त्या पाहण्याची दृष्टी नक्की बदलता येते.
२) घेण्यापेक्षा देण्यात आनंद शोधा:
दुसऱ्याला सुख देणं हेच खऱ्या आनंदाचं मूळ आहे. ‘घेणं’ हे अपेक्षेचं लक्षण आहे, तर ‘देणं’ हे प्रेमाचं. आपण बघतो — देतानाचा फोटो अधिक मनापासून घेतला जातो, कारण त्यात समाधान असतं.
३) स्वतःला जबाबदार माना:
नेहमी दुसऱ्याला दोष देण्याऐवजी ‘हे माझ्या कर्माचे फळ आहे’ अशी आत्मस्वीकृती ठेवा. प्रारब्धामुळे संकटं येतात, पण पुरुषार्थाने त्यावर मात करता येते.
जसे वैद्य औषध देतो आणि शरीर बरे होतं, तसेच साधना, तपश्चर्या, जप-तप हे आपल्याला कर्मक्षयी बनवतात. जसे दूध गरम केल्याने मावा तयार होतो, सोने तापवल्यावर तेजस्वी होतं, तसंच तपश्चर्येच्या अग्नीत आत्मा तपल्यावर त्याचे कर्म जळून नष्ट होतात.
मन, वासना आणि परिग्रह यांचा त्याग करून, उपासना, अपरिग्रह आणि साधना यांचा स्वीकार करा.
जैन धर्मातील प्रत्येक स्तोत्र, प्रत्येक मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे की, जर ती श्रद्धेने आत्मसात केली, तर जीवनातील अनेक समस्या सहज दूर होऊ शकतात.
या चातुर्मासाच्या पावन पर्वात, आपल्या आत्म्याला शुद्ध करण्याचा संकल्प करूया. प्रभू महावीरांच्या वाणीत सांगितलेल्या तत्वांचा अवलंब करूया.