श्रीरामपूर दि. 14 (रमेश कोठारी) गुरूंशिवाय जीवनाला अर्थ नाही. गुरूंच्या मार्गदर्शनानेच जीवन सफल होते. गुरु अंधार दूर करून प्रकाश दाखवितात .जे गुरूंच्या चरणी बसतात ते भाग्यवंत पण गुरूंच्या हृदयात जे जागा मिळवितात तेच खरे यशवंत असे विचार जैन स्थानकमध्ये प्रवचनातून प्रखर व्याख्यात्या प.पु.विश्वदर्शनाजी यांनी व्यक्त केले.
गुरूंची महती विषद करताना त्या म्हणाल्या कि, गुरु हे भूतकाळातील दुवा आणि भविष्यकाळातील दिवा असतात. गुरुकृपा होते हि भाग्याची गोष्ट आहे. गुरुचरण,स्मरण व वंदन हि त्रिसूत्री लक्षात ठेवावी.भक्त हि लहान नौका तर गुरु हि मोठी नौका आहे. मोठी नौका लहान नौकेला आधार देत नदी किंवा समुद्र पार करते.गुरूंची निंदा करू नका.
आपल्या जीवनात माता पिता हे आपले प्रथम गुरु आहेत. गुरूच्या प्रति अंतःकरणापासून प्रेम असेल तर गुरूंपासून आपल्याला ऊर्जा मिळते .गुरुवर अटळ श्रद्धा ठेवा. तेच निश्चित मार्ग दाखवतील .गुरु सत्याचा मार्ग दाखवितात .गुरुकृपेची अनुभूती नक्की मिळणारच .
आई वडील हे आपले प्रथम गुरु असल्याने त्यांची ३६५ दिवस आठवण ठेवा . त्यांच्या पायावर डोके ठेऊन त्यांचे आशीर्वाद मिळतात. आई,वडील ,गुरूंच्या चुकांवर चर्चा करू नका. त्यांचे चांगले गन आत्मसात करा .जीवनाला नवी दिशा मिळेल . देव ,धर्म ,गुरू या तिघांना महत्वाचे स्थान आहे. गुरु जीवनाचे संतुलन राखतात. वाईट प्रवृत्तीपासून वाचवितात रामभक्त हनुमानासारखी श्रद्धा असावी .गुरूच्या हृदयात जागा मिळविण्यासाठी समर्पित व्हावे लागते असे स्पष्ट केले.