जालना (प्रतिनिधी) : जालना जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामांना गती मिळण्यासाठी निधी मंजूर करावा, रामनगर येथील साखर कारखाना सुरू करण्यासाठी राज्य शासनाने मदत करावी, अशा विविध विषयांवर शिवसेना उपनेते माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याशी आज चर्चा करून जालना जिल्ह्यात भेटीसाठी निमंत्रण दिले.
मुंबई येथे मंञालयात शुक्रवारी ( ता. 05)मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची अर्जुनराव खोतकर यांनी भेट घेऊन विविध विकास कामांबाबत चर्चा केली. या वेळी माजी मंत्री अब्दुल सत्तार,सुरेश नवले, माजी मंत्री शंभुराजे देसाई ,आ.भरत गोगावले, आ. प्रकाश अबिटकर पंडीतराव भुतेकर यांची उपस्थिती होती.
जालना जिल्ह्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन , लोकार्पण करण्यासाठी श्री. खोतकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितला, पुढील आठवड्यात वेळ देण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या बैठकीमध्ये प्रामुख्याने कुंडलिका नदीवरील मंजूर हातवन प्रकल्पाचे काम सुरू करावे, नुकसानग्रस्त शेतीचे पिकं व फळ उत्पादक शेतकऱ्यांचे
मदतीबाबत पंचनाम्यांचे आदेश दिले जावेत, जालना शहरातील रस्त्यांचा प्रश्न व विस्कळीत पाणीपुरवठा ,तसेच झोपडपट्टी धारकांना मालमत्ता पत्रकाचे वितरण करण्याबाबत होत असलेली दिरंगाई अशा जनतेच्या प्रश्नांवर माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याशी चर्चा केली व त्यांचे लक्ष वेधले.