Sagevaani.com /जालना : चोथमलजी म. सा. यांच्या सप्ताहानिमित्त आज संघात साध्वी प. पू. सत्यसाधनाजी म. सा. यांनी त्यांचा विषय घेऊन प्रवचन दिले. त्या म्हणाल्या की, गुरु कृपेशिवाय काहीही खरे नाही, तुम्ही कितीही प्रयत्न करा परंतू यश येईलच, हे काही सांगता येत नाही.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. यावेळी पुढे बोलतांना साध्वी प. प. सत्यसाधनाजी म. सा. म्हणाल्या की, राजस्थान मध्ये असतांना त्या काळी काहीही सुविधा नव्हत्या, आज जशा आहेत तशा! एक दिवस ते आपल्या कामासाठी निघाले. वाटेत एक आदीवासी समाजाचा मुलगा नाग डसल्याने वारला होता. त्याला तिरडीवर टाकले होते, एवढेच नव्हेतर त्याच्या कपडा सुध्दा टाकण्यात आला होता. नुसते बांधायचे बाकी होते.
तितक्यात त्या मुलाचे आजोबा म्हणाले, ते पहा जैन मुनि चालले आहेत. त्यांना बोलावून आणा, निदान ते तरी मृत्ताआत्म्यास आशिर्वाद देतील! परंतू तेथे उपस्थित असलेले काही लोकांचा याला विरोध होता. परंतू काही लोक चोथमल महाराजांकडे गेले, त्यांना विनंती केली, ते आले.
त्यांनी त्या मुलाला पाहिले, काही मंत्रोच्चार केला आणि त्याच्यावर थोडे पाणी शिंपडले, ते तेथून माघारी जाण्यास निघाले, तेव्हढ्यात त्या मुलाने थोडीफार हालचाल केली. नंतर त्याने डोळे उघडले, नंतर तो उठून बसला! त्याच्या घरच्यांना खूप आनंद झाला. हे केवळ त्या जैन मुनिमुळे शक्य झाले, ते काहीही देण्याचा प्रयत्न जैन मुनिंना करु लागले, परंतू मी त्याचा संपूर्णपणे त्याग केला आहे, तुम्हाला जर मला काही द्यायचे असेल तर आपण मांसाहार सोडून द्या आणि साधु महाराज दिसले की, त्यांना मनोभावे वंदन करा, त्यांना कुठलाही त्रास देऊ नका, असे चोथमल म. सा. यांनी सांगितले. आणि ते आपल्या मार्गाला लागले.
हे सर्व कशाने शक्य झाले तर चोथमल महाराजांच्या साधनेमुळे, तपश्चर्येमुळे! अशीच बुध्दी तुम्हा- आम्हाला लाभो, त्यांच्या सारखी तपश्चार्या, आराधना आपल्याला लाभावी, एवढीच त्यांच्या चरणी प्रार्थना, असेही शेवटी साध्वी प. पू. सत्यसाधनाजी म. सा. यांनी सांगितले. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती. शेवटी श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी कार्यक्रमाचे सुत्र संचालन करुन सर्वांचे आभार मानले.